अखेर झाली आता घे प्रणाम जाता जाता
जिंकुनी तुजला प्रेमे होईन दास तुझा जन्माचा
या आशेवर जीव टांगला होता या दिनाचा
नजर जराशी तुझी बदलता थोडा थोडा होई
वेडा माझा जीव बुडविला तू शोकाच्या डोही
होते नव्हते त्याची केली तुझ्या ठिकाणी पोच
जिवाच्या जाळ्यात झेलला शब्द न पडला तोच
रूप मनोहर असले बुद्धीही तीव्र लाभली तुजला
खरया गुणाची पारख काही असेल तव हृदयाला
वेडी आशा अशी धरुनिया धडा जीवाचा केला
भल्याबुऱ्याच्या भेद न तुजला अनुभव भलता आला
केल्या ज्याच्या पायघड्या मी तुझ्या पावलांसाठी
त्या हृदयाला तुडवून गेलीस नटव्या थाटापाठी
जग सगळे हे डोळ्यां पुरते, रूप जीवाला पुरते
उदार हृदया परी निर्दय जग दगडाखाली पुरते
ज्या देवाने जग हे केले, ज्या प्रेमे हे चाले
त्या देवाला, त्या प्रेमाला जाळीन आता बाले
जगावाचुनी लाभतीस तरी जग मी केले असते
तुझ्यावाचुनी जग हे आता असून झाले नसते
दिला तिलांजली अश्रूंचा हा त्या प्रेमाच्या नावा
परतायचे नाही आता त्या प्रेमाच्या गावा
होईल होईल वाटत होते तेच अखेरीस झाले
नाव घेतल्यावाचून आता मनात झुरणे आले
0 comments:
Post a Comment