Searching...
Thursday, 31 August 2017

सारंगा




सारंगा परतून आली
वाजती सख्यांचे चाळ
पदरात अडकली त्यांच्या
चांदीची उडती धुळ…..
घडिघडि विघटतो वारा
बांधावी त्याची मोळी
उमजेल सख्यांना कैसे?
अंगात फुलांची चोळी.
प्रतिबिंब जळाशी ठेवून
सारंगा झाली गौळण
परतीच्या वाटेवरती
पणतीचे फिटते अंजन...
शोकाकुल झाले मेघ
गावांत धुळीची स्मरणे
उजळून कुणी देईल का?
मातीत गाडले सोने
झाडांत दाटती जेव्हा
सावल्या जिवाहून भारी
सारंगा माझ्या मागे
ठेविते निळी अंबारी


सारंगा मालन होती
तेव्हाही होते पाणी
कवि एखादाच उजळतो
स्वप्नांची सत्य कहाणी


उघडा हो वैष्णव गुंफा
काढा ना तिथला मोर
त्या कृष्णपिसाऱ्यावरती
वाऱ्याने होतील वार....


राखेची असते मादी
शब्दांना नसते तंत्र
मृत्यूच्या कानामध्ये
गुणगुणता येतो मंत्र


मी नम्र शहाणा याचक
मागतो उन्हाची भीक
कातडीस सांभाळावा
झोळीचा पुरता धाक


सारंगा परतून आली
वाटेवर पडला रांजण
त्यातून मला उचलू द्या
आईचे माझ्या पैंजण.....




1 comments:

 
Back to top!