भयाण वादळ, भीषण लाटा, भरकटले जीवन माझे
आज व्यथेच्या, सागरात मी, नांगरले जीवन माझे
पुन्हा दुरुस्ती, डागडुजी अन, तोच रंग, परतून दिला
नवी सजावट, नवी मांडणी, भेदरले जीवन माझे
त्याच फाटक्या, झोळीमध्ये, नवा जोगवा, स्वप्नांचा
नवी पालवी, नवीन अशा, मोहरले जीवन माझे
बंद घरासम, बंद ठेविले, तिने स्वतःला, आजवरी
याच तिच्या ह्या, वागणुकीने, पोखरले जीवन माझे
खचल्या होत्या, साऱ्या भिंती, घर तकलादू झालेले
विद्युलतेने, हात दिला अन, सावरले जीवन माझे
एकांताच्या, देवळीत या, तेवत आहे, दीप जरी
प्रकाश नाही, पतंग नाही, मालवले जीवन माझे
मी माझ्या, हातानी रचली, चिता 'इलाही', प्रीतीची
व्यथा वंचना, जखमांनी मग, सावडले जीवन माझे
0 comments:
Post a Comment