Searching...
Thursday, 31 August 2017

घात



मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा?
अज्ञात झर्‍यावर रात्री
मज ऐकू येतो पावा!


श्वासांचे घेऊन बंधन
जे हृदय फुलांचे होई
शिशिरात कसे झाडांचे
मग वैभव निघुनी जाई?


सळसळते पिंपळपान
वार्‍यात भुताची गाणी;
भिंतीवर नक्षत्रांचे
आभाळ खचविले कोणी?


मन बहरगुणांचे लोभी
समई वर पदर कशाला?
हे गीत तडकले जेथे
तो एकच दगड उशाला!


चल जाऊ दूर कुठेही
हातात जरा दे हात;
भररस्त्यामध्ये माझा
होणार कधीतरि घात …



0 comments:

Post a Comment

 
Back to top!