Searching...
Sunday 27 August 2017

इराणी



इराणचा चकणा शहा पहातो तडकलेल्या व सस्मित
काचेआड केकला चढणारी क्रमिक बुरशी.
क्वचित विचलित करते त्याचे लक्ष सुशिक्षित
बेकाराला राखीबाधताना अकृत्रिम माशी.
चित्रातील वनराजींच्या कुशाग्र निर्जिवतेस व्यग्र
करीत नाही वारा ; अन सरळ सरोवराचे विपर्यास
वाकडा हंस. सुईसारखा सीधा मार्ग
अग्रावर तोलतो राखीव बंगल्याचा रेखीव आभास.
अशा निसर्गचित्रांची होते ग्लासात अविद्राव्य तारांबळ
घोटागणिक परिच्छेद पाण्याचा लांबताना तृषार्तासमक्ष.
जिज्ञासूंचे वेधू इच्छिते चहाचे विचक्षण वर्तुळ
विचारप्रवर्तक टेबलाच्या महत्वाच्या भागाकडे लक्ष.
खुर्चीखालील अंधारांना निमित्त झालेले मांजर,
गतप्रभ दुश्चिन्ह, सांभाळते दुटप्पी झोपेत दोन
सापत्न स्वप्नप्रपंच. दिशांची अफरातफर
करून बिलोरी मंत्रीमंडळ पिकवते अप्रच्छन्न प्रतिबोंब.
सिगारेट पेटवून बेकार ठेवतो जळणारी काडी
चहाच्या वर्तुळात जी उठून बसते विझताना जरा.
अगत्यशील जशी लाश बर्फाच्या लादीवर उघडी
समशीतोष्ण कोणी आलासे वाटताच सगा सोयरा.

0 comments:

Post a Comment

 
Back to top!