Searching...
Friday, 1 September 2017

पाऊसगाणे



पाऊस आला पाऊस आला
गारांचा वर्षाव
गुरे अडकली रानामध्ये
दयाघना तू धाव!


मेघांचे कोसळती पर्वत
दरी निनादे दूर
गाव चिमुकला वाहून जाइल
असा कशाला पूर?


इवल्याला पक्षांच्या डोळी
वृक्ष थबकले सारे
आणि मुळाला त्यांच्या उपटे
वेड घेतले वारे


थांब जरासा हृदयी माझ्या
ढगात लपल्या देवा
काठावरती जरा आणुदे
पुरात फसल्या नावा


या गावाच्या पारावरती
कुणी नसे रे वेडी
गढीत नाही भुजंग शापित
जो वंशाला तोंडी


इथे कुणीतरी रचले होते
झिमझिम पाऊसगाणे
जाता येता टाकित होता
तो चिमण्यांना दाणे.....



0 comments:

Post a Comment

 
Back to top!