Searching...
Friday 1 September 2017

काळा घोडेस्वार




पाठीवर बाहुलीच्या
चांदणीचा शर
गोऱ्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार.


प्राक्तनाच्या घळीमध्ये
पावसाचे पाणी
अंधारात घोड्यालाही
ओळखले कोणी?


पुरूषाच्या पुढे आली
हिला चढे माज
चार बाया मिळूनिया
काढा हिची लाज


रानझरा ओळखीचा
तहानेची बोली
कात टाकलेला साप
पाचोळ्याच्या खाली


पिंपळाच्या पारावर
ब्रह्मचारी रडे
अंगठीत बसवले
मांत्रिकाने खडे


जोडव्याच्या जोडालाही
डोह घाली धाक
कुंकवाच्या करंड्यात
बाभळीची राख


पाठीमागे उभा त्याचे
दिसेल का रूप?
आरशाच्या शापानेही
आलिंगन पाप

फुफ्फुसाला वारा देती
कळलाव्या ग्रंथी
घोड्याच्याही डोळ्यावर
काळोखाची बुंथी


न्हाऊनीया केस ओले
दारामंदी आली
खुंटीवर टांगलेली
चोळी चोरी गेली


पलीकडे नदी नादे
अलीकडे पूल
हिरकणी खांबाखाली
गाडलेले मूल  


बाभळीच्या विजेपाशी
सावरीची शेज
बोंबाबोंब झाली तेव्हा
डोळा आली नीज


आभासाने येतो वारा
माझ्या मागे मागे
कस्तुरीच्या हरिणाला
जशी आग लागे


दू:ख दिले त्याने
तोच दान मागणार
गोऱ्या मुलीसाठी आला
काळा घोडेस्वार


वाटेवर त्याच्या नाही
मेणुलीचा दिवा
जशी दिशा तसा जातो
कोणत्याही गावा



0 comments:

Post a Comment

 
Back to top!